BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती हॉस्पिटलमध्ये मृत रुग्णाचे डोळे व त्वचा दान | रोटरी क्लबच्या स्किन बँकेने केले त्वचा संकलन


भारती हॉस्पिटलमध्ये मृत रुग्णाचे डोळे व त्वचा दान |  रोटरी क्लबच्या स्किन बँकेने केले संकलन

भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मृत झालेल्या एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या रुग्णाचे डोळे आणि त्वचा दान केली. रोटरी क्लबतर्फे चालवल्या जाणाऱ्या स्किन बँकेने त्या रुग्णाच्या स्किनचे संकलन केले.

भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येकाने मृत्यूपश्चात आपले अवयवदान करावे. 

भारती हॉस्पिटलमधील डॉ. समीरा शेख (ज्युनिअर रेसिड्नट सर्जरी) आणि डॉ. समर्थ प्रजापती (ज्युनिअर रेसिड्नट, त्वचा रोग) व नेत्र विभाग यांनी या त्वचा आणि नेत्रदानाला सहाय्य केले. स्किन बँकेच्या डॉ.दिलीप पटवर्धन व डॉ.चंद्रशेखर पुरंदरे यांच्यासह भारती हॉस्पिटलच्या त्वचा विभागप्रमुख डॉ. रेणुका अष्टेकर यांनी नातेवाईकांचे कौतुक करत आभाराचे पत्र दिले. यावेळी डीन डॉ. सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी उपस्थित होते.

डॉ.जोशी यांनी भारती हॉस्पिटल त्वचादानास प्रोत्साहन देत आहे व यापुढेही कार्यरत राहील असे सांगितले. 

श्रीमती कलावती चिंतामण पटवर्धन रोटरी स्किन बँक गेली ८ वर्षे रोटरी क्लब ऑफ सांगलीद्वारे चालविली जाते. संपूर्ण भारतातील फक्त ८ स्किन बँकांपैकी ही एक आहे. मृत्यूच्या ६ तासांच्या आत त्वचा संकलित करून त्यावर व्यवस्थित प्रक्रिया केली जाते. त्वचा फ्रीजमध्ये योग्य तापमानात साठवली जाते. ती ५ वर्षांसाठी वापरली जावू शकते. या त्वचेचा मुख्य वापर गंभीर भाजलेल्या रुग्णांमध्ये होतो. मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. कारण ही त्वचा जैविक ड्रेसिंग म्हणून कार्य करते. ही हैदराबाद, बेंगलोर आणि कोलकाता येथील संशोधन केंद्रांद्वारे देखील वापरली जाते.

बँकेला यापूर्वीच १०८ त्वचा दान प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये भारती हॉस्पिटलमध्ये काल झालेल्या त्वचादानाचा समावेश आहे. यावेळी सर्जरी विभागप्रमुख डॉ.विनोद प्रभू, डॉ.डी.जी.मोटे, डॉ.उमेश अवरादे व सर्व डॉक्टर उपस्थित होते.