भारती हॉस्पिटलमध्ये पंधरा वर्षाच्या मुलीच्या छातीतून काढली बंदुकीची गोळी | डॉक्टरांची यशस्वी कामगिरी-मुलगी सुखरूप
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
सराव करत असताना गनमधून गोळी सुटून एका पंधरा वर्षीय मुलीच्या छातीत घुसली. येथील भारती हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर यांनी दोन तास ऑपरेशन करून छातीतून गोळी बाहेर काढण्यात यश मिळवल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम. कदम यांनी दिली. येथील सीव्हीटीएस डॉ. रणजितसिंह जाधव व डॉ. माजिद मुल्ला यांचे कौशल्य पणाला लागले होते. आता मुलगीची प्रकृती उत्तम असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. डॉक्टरांनी दिलेली अधिक माहिती अशी की, येथील एका परिसरात गन घेऊन काहीजणांचा सराव चालला होता याच दरम्यान ही घटना घडली.
मुलगीला तात्काळ उपचारासाठी नामांकित खाजगी रुग्णालयात दाखल केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सीव्हीटीएस सर्जन डॉ. पृथ्वीराज पाटील यांनी डाव्या छातीत ट्यूब टाकली रक्त चढवून रुग्णाला स्थिर केले. रक्त संक्रमण दिले. पुढील उपचारासाठी मुलीला भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला.
भारती हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गोळी लागलेल्या मुलीला दाखल केले. इन्टरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉ. अभिनव मोहन यांनी नेमकी गोळी कुठे आहे हे सीटी स्कॅन तपासून दाखवले. त्यानंतर सीव्हीटीएस सर्जन रणजितसिंह जाधव यांनी रुग्णावर तात्काळ थोराकोटॉमी आणि एक्स्प्लोरेशन शस्त्रक्रिया केली. म्हणजे छातीच्या फुफुसाच्या जागेत प्रवेश मिळवण्यासाठी एक शस्त्रक्रिया असते ती करून गोळीचा शोध घेतला. गोळीमुळे इजा झालेले फुप्फुस व्यवस्थित केले. महाधमनीला गोळीमुळे झालेले छिद्र बंद करून रक्तस्त्राव थांबवला. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर ती गोळी काढण्यात डॉक्टरांना यश आले. विशेष बाब म्हणजे डॉ.सम्राट मदनाईक यांनी शस्त्रक्रियेदरम्यान एकच फुप्फुस चालू ठेवले होते. दुसरे फुप्फुस तासभर बंद ठेवले होते.
सीव्हीटीएस विभाग प्रमुख डॉ. रणजितसिंह जाधव यांनी सांगितले की, मुलीच्या घरची परिस्थिती नाजूक आहे. शस्त्रक्रियेचा खर्च करण्याएवढी त्यांची ऐपतही नाही. संबंधित संस्थेने शस्त्रक्रियेचा खर्च उचलला. यापुढे रुग्णाचे आयुष्य काही आठवड्याच्या विश्रातीनंतर सामान्य जगणे चालू होईल, ती शाळेतही जाईल असा आशावाद व्यक्त केला.
गोळी लागलेल्या मुलीची परिस्थिती सामान्य आहे. नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले. मुलीला घरी सोडण्यात आले.
कार्डियाकचे भूलतज्ज्ञ डॉ.सम्राट मादनाईक यांच्यासह डॉ.प्राची, डॉ.तरल व सर्व टीमचे सहकार्य लाभले. अधिष्ठाता डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी यांच्यासह सर्वांनी टीमचे कौतुक केले.