भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाच्यावतीने समाज प्रबोधन सप्ताह साजरा | सुमारे १३५० जणांनी घेतला लाभ
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ८ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत समाज प्रबोधन सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी आरोग्य विषयक जनजागृती केली. सुमारे १३५० जणांनी या सप्ताहातील विविध उपक्रमाचा लाभ घेतला.भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम.कदम यांच्या संकल्पनेतून नर्सिंगचे प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उप-प्राचार्य डॉ. प्रविण दाणी आणि प्रा. डॉ. धनराज बाबू व सर्व प्राध्यापकांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
सुरूवातीला 'पालकांना सक्षम करणे आणि मुलांचे पालन पोषण करणे' या उद्देशाने नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुपवाड येथील म.न.पा. शाळा क्र. ३६ येथे कुपोषणावर पथनाट्य, आरोग्य प्रदर्शन, निरोगी आणि संतुलित आहाराचे महत्त्व सांगितले. प्राथमिक शाळेतील ९२ व अंगणवाडीतील २० मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
वानलेसवाडी हायस्कूलमध्ये वैयक्तिक आणि पर्यावरणीय स्वच्छतेबद्दल जागरूकता या विषयावर पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते.कै.आर.व्ही.भिडे, शारीरिकदृष्ट्या अपंग शाळा, मिरज येथे मोबाईल व्यसनाच्या धोक्यांवर एक मूकनाट्य सादर केले. तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी सजग तंत्रज्ञानाच्या सवयींचे महत्त्व या विषयावरही पथनाट्य सादर केले. फळ व मिठाई वाटप करण्यात आले.
प्राथमिक विद्यालय वारणाली कुपवाड येथे PCOS वर जंक फूडच्या परिणामावर पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले.
याबरोबरच महिला सक्षमीकरणाचे महत्त्व या विषयावर आरोग्य प्रदर्शन भरविण्यात आले होते.चैतन्यश्रम वृद्धाश्रम, विश्रामबाग येथे वृद्ध व्यक्तींना भारती हॉस्पिटलमधील विविध योजनांची माहिती दिली. सर्व उपचार एका छताखाली होत असल्याचे सांगितले.