भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
स्व. डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व प्र-कुलगुरू डॉ.विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्येफूट पेडोबॅरोमीटर सुविधेचे उद्घाटन भारती हॉस्पिटल पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजित जोशी, ऑर्थोपेडिक विभागप्रमुख डॉ.श्रीकांत देशपांडे, डॉ. सुजय महाडिक उपस्थित होते.
डॉ.अस्मिता जगताप म्हणाल्या,हे अत्याधुनिक तंत्रज्ञान पाय आणि घोट्याच्या विकारांच्या निदान आणि उपचारांमध्ये क्रांती घडवून आणेल.
ऑर्थोपेडिक विभागाचे असो.प्राध्यापक डॉ.सुजय महाडिक म्हणाले, फूट पेडोबॅरोमीटरी हे एक प्रगत निदान साधन आहे जे पायांच्या कार्याचे विश्लेषण करण्यासाठी प्रेशर सेन्सर आणि संगणक अल्गोरिदम वापरते, पाय यांत्रिकी, संतुलन आणि गतिशीलता याबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करते. या तंत्रज्ञानामध्ये रुग्णाचे परिणाम सुधारण्याची, संशोधन वाढवण्याची आणि पाय आणि घोट्याच्या विकारांबद्दलची आमची समज वाढवण्याची क्षमता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. याचा वापर करून येथे आता दर बुधवार व शनिवारी सकाळी ९ ते ३ यावेळेत मोफत पाय तपासणी शिबीर होणार आहे. यामध्ये सपाट पाय, संधिवात, टाच दुखी, खेळण्यातील दुखापती, मधुमेहामुळे झालेल्या पायातील जखमा, तळपायाची जळजळ, वेडेवाकडे चालणे या सर्व प्रकारच्या पायांच्या समस्या व तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व उपचार करण्यात येणार आहेत.
याचा लाभ घेण्याचे आवाहन भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी केले आहे.