भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजीओथेरपीत दीक्षारंभ कार्यक्रम
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फिजिओथेरपी यांनी १ ते ३ ऑगस्ट २०२४ रोजी भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ. एच.एम. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२५ च्या प्रथम वर्ष बॅचलर ऑफ फिजिओथेरपी विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.
या तीन दिवसांत हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज परिसर अभिमुखता आणि विविध जागरूकता चर्चा आणि शैक्षणिक अभिमुखता व्याख्याने संपन्न झाली.
यामध्ये डॉ. प्रशांत नाईक - यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली, डॉ. आनंद अनुसे - पीअर मेंटॉरिंग कार्यक्रम. डॉ. शीतल स्वामी - फिजिओथेरपीमध्ये करिअरच्या संधी. डॉ. हर्षदा पाटील यांनी समित्या आणि त्यांचे महत्त्व सांगितले.
२ ऑगस्ट रोजी डॉ सुनील हर्सूलकर यांनी परीक्षा आणि मूल्यमापन व डॉ. मनाल अंथिकट यांनी निरोगी सक्रिय जीवनशैलीविषयी नवीन विद्यार्थ्यांना माहिती दिली.
३ ऑगस्ट रोजी सांगली सायबर पोलीस स्टेशन सपोनि रुपाली बोबडे यांनी सायबर फसवणुकीचे प्रकार आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप शिंदे यांनी स्वसंरक्षण कसे करावे हे सांगितले. पोलीस विभागाला गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा कमी करण्यास कशी मदत करावी हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.
स्कूल ऑफ फिजीओथेरपीच्या प्राचार्या डॉ.स्नेहा कटके म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी जिज्ञासा आणि आजीवन शिक्षण स्विकारावे. टीमवर्कशिवाय कोणतंही काम अशक्य आहे. त्यामुळे मुलांनी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. संवाद कौशल्य वाढवायला हवे. या सर्व गोष्टींबरोबरच फिजीओथेरपी क्षेत्रातील नवीनतम संशोधन आणि प्रगतीसह अद्ययावत राहण्यास सांगितले. सूत्रसंचालन डॉ. अमोघ कुलकर्णी यांनी केले.
यावेळी डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, डॉ.सचिन शेट्टी यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.