भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये कॅडॅव्हरीक कार्यशाळा संपन्न
भारती हॉस्पिटल न्यूज / सांगली - रोहित रोकडे
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँण्ड हॉस्पिटलमध्ये इलिझारोव्ह रिंग फिक्सेशन याची कॅडॅव्हरीक कार्यशाळा संपन्न झाली. महाराष्ट्रात प्रथमच भारती हॉस्पिटलमध्ये ही कार्यशाळा झाल्याचे भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी सांगितले.
दृक - श्राव्य माध्यमातून उपस्थित डॉक्टरांना तज्ञांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत येथील विभागप्रमुख डॉ. श्रीकांत देशपांडे, डॉ.ऋता कुलकर्णी, डॉ.मधुरा कुलकर्णी, डॉ.मनीष प्रसाद, डॉ.आराधना राठोड यांनी रिंग फिक्सेशनबाबत सांगितले.
विभागप्रमुख डॉ. देशपांडे म्हणाले, कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या डॉक्टरांनी स्वतः कॅडॅव्हरवर शस्त्रक्रियेचा अनुभव घेतला. कौशल्य विकासासाठी अशा कार्यशाळा अतिशय उपयोगी असतात
डॉक्टरांना भविष्यातील रुग्णांची वेडीवाकडे, न जुळणारी हाडे, यांवर इलिझारोव्ह रिंग फिक्सेशन हा सर्वोत्तम उपाय आहे. इलिझारोव्ह उपचाराचा उपचारात्मक फायदा हा आहे की, हाड दुरुस्त होण्याची वाट पाहत असताना रुग्ण शारीरिकदृष्ट्या सक्रीय राहू शकतो. इलिझारोव्ह उपकरणांचा वापर लांब हाडातील संरचनात्मक दोषांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हे उपकरण हातांच्या किंवा पायांच्या खराब झालेल्या हाडांची लांबी वाढवण्यासाठी किंवा आकार देण्यासाठी वापरले जाते.
या सर्व सुविधा भारती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. यावर शस्त्रक्रियादेखील होते. या परिषदेचा लाभ महाराष्ट्रासह कर्नाटकमधील एकूण ५० हून अधिक डॉक्टरांनी घेतला.