हॉस्पिटल हेच परिचारिकांचे कुटुंब - महेंद्र लाड l भारती हॉस्पिटलमध्ये पारितोषिक वितरण संपन्न
भारती हॉस्पिटल न्यूज - सांगली / रोहित रोकडे
भारती हॉस्पिटल असो वा इतर सर्व हॉस्पिटलमध्ये परिचारिका हा घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यांचे योगदान रुग्णांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेच त्यापुढे जाऊन सांगायचे झाले तर हॉस्पिटल हेच आपले एक कुटुंब मानून त्या सेवा करत असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांनी केले.
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे प्रमुख उपस्थित होते. आयोजन भारती विद्यापीठ नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.निलिमा भोरे यांनी केले होते.
पोस्टर प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा व लघुनाट्य स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले.
महेंद्र लाड म्हणाले, सर्व परिचारिका या प्रामाणिकपणे काम करत असतात. आलेल्या रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. त्यांचं दुखणं जाणून घेतात. त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करतात. सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. परिचारिकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक सुंदर अशी भेटवस्तू सर्वांना देण्यात आली.
रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य जे.के. बापू जाधव यांनीही शुभेच्छा दिल्या.
हॉस्पिटलची काळजी परिचारिका चांगल्या पद्धतीने घेतात म्हणून डॉ.एच.एम.कदम यांनी ४२ हजार रुपयांची रक्कम दिली. त्यातून सर्वांना बक्षीसे देण्यात आली. त्यांचा सत्कार डॉ.निलिमा भोरे व सरस्वती हेरवाडे यांनी केला.
वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, डॉ.डी.जी.कणसे, डॉ.स्नेहा कटके, डॉ.शिल्पा गायकवाड, डॉ.पंकज पलंगे, डॉ. नितीन मुदीराज यांच्यासह सर्व परिचारिका उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन प्रा. डॉ.अपर्णा काळे तर आभार सरस्वती हेरवाडे यांनी मानले.