BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण | प्रतिबिंब २०२३ सोहळा संपन्न


भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण 
| प्रतिबिंब २०२३ सोहळा संपन्न 

सांगली / रोहित रोकडे 

येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये प्रतिबिंब २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये ट्रेडिशनल डे, डान्स, म्युझिक यांसह विविध राज्यांतील कलागुण विद्यार्थ्यांनी सादर केले. 

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.एच.एम.कदम यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कॉलेजच्या आवारात विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची वेशभूषा करत घोड्यावर स्वार होऊन दाखल झाले होते. एक वेगळाच माहौल भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये पाहायला मिळत होता. 

जय भवानी जय शिवाजीच्या गजरात आसमंत दणाणून गेला. एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक मोठ्या थाटात आणि जल्लोषात निघाली. 

डॉ.एच.एम.कदम म्हणाले, विविध कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ चांगलं आहे. विविध गुणदर्शन कार्यक्रमांतून एक चांगली उर्जा निर्माण होते. दैनंदिन अभ्यासक्रमातून वेळ काढून मुलांनी उत्तम सराव केला आहे. त्यांचे सादरीकरण उत्तम झाले. यातूनच एखादा कलाकार जन्म घेवू शकतो.

दरम्यान ढोल ताशांच्या गजरात मुलींनी प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये लेझीम व झांज पथक यांचा समावेश होता. प्राध्यापक व डॉक्टर यांचा सहभागही महत्त्वाचा ठरला.चार दिवस असणाऱ्या या कार्यक्रमात ट्रेडिशनल डेची धमाल पाहायला मिळाली. येथे प्रत्येक राज्यातील विद्यार्थी एमबीबीएसचे शिक्षण घेत असल्याने त्या-त्या राज्यातील वेषभुषा सर्वांनी पाहता आली. भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली असल्याने जम्मू काश्मीरपासून केरळपर्यंत विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. त्या प्रांतातील गाण्यावर नृत्य केले. संबंधित राज्याचे महत्त्व, संत, महापुरुष, गुणवैशिष्ट्ये आदींचा आढावा मुलांनी व्यासपीठावर घेतला. 

विद्यार्थ्यांचा एक वेगळाच माहौल प्राध्यापक, डॉक्टर व सर्व स्टाफने अनुभवला. एमबीबीएसच्या ६००-७०० विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमात शंभर टक्के सहभाग नोंदवला. डॉक्टरकीचे शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये एक कलाकारही दडलेला असतो हे यानिमित्ताने सिद्ध झाले. या कार्यक्रमाबरोबरच क्रीडा स्पर्धाही संपन्न झाल्या. 

अस्थिरोग शाखेचे प्रा. डॉ. सुनील पाटील व डॉ.सुषमा धोंडे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले. या सर्व समारंभाचा बक्षीस वितरण डॉ.एच.एम.कदम, डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी, डॉ.सुनिल पाटील, डॉ.पंकज पलंगे, डॉ.नितीन मुदीराज, डॉ.अजित लिमये यांच्याहस्ते करण्यात आला. 

हा सर्व चार दिवसांचा भरगच्च कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि आ.डॉ.विश्वजित कदम तसेच भारती हॉस्पिटल पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिताताई जगताप यांचेही बहुमोल सहकार्य लाभले. डॉक्टर व प्राध्यापकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.