सांगली -दि.१८/३/२०२३
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये जागतिक काचबिंदू जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. याचे उद्घाटन डीन डॉ.सारा धनवडे यांच्याहस्ते करण्यात आले. भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजित जोशी प्रमुख उपस्थित होते. नेत्ररोग विभागामार्फत याचे आयोजन केले असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ.राजेश गोटेकर यांनी दिली.स्व. डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डीन डॉ.सारा धनवडे यांनी काचबिंदू, मोतीबिंदू एकूणच डोळा या संवेदनशील भागाविषयी कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. काचबिंदू आजार सामान्य माणसाला माहिती नसतो. त्यामुळे काचबिंदूचे निदान दृष्टी शाबूत ठेवण्यासाठी वेळीच होणे गरजेचे आहे.
काचबिंदूची लक्षणे
काचबिंदू हे जगातील अंधत्वाचे दुसरे प्रमुख कारण आहे. समोर सरळ बघत असताना कडेचे काहीही न दिसणे, धुरकट दृष्टी, वाचताना अडचण येणे, डोळे दुखणे, तीव्र डोकेदुखी व पोटदुखी ही त्याची लक्षणे आहेत.
काचबिंदूविषयी माहिती सांगताना वैद्यकीय अधिक्षक डॉ.अजित जोशी म्हणाले, काचबिंदू हा मोतीबिंदूपेक्षा धोकादायक आहे. यामध्ये रुग्ण अंध होण्याचे प्रमाण जास्त आहे. काचबिंदूचे ८० दशलक्ष रुग्ण या जगात आहेत. पाच वर्षांत हे रुग्ण वाढणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. तो टाळण्यासाठी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेवून उपचार घेतले पाहिजेत. वय वर्षे ४० च्या पुढे प्रत्येकाने डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून काचबिंदूचे निदान करणे आता सोपे होणार आहे.
विभागप्रमुख डॉ.राजेश गोटेकर यांनी कार्यक्रमास उपस्थित रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना काचबिंदू त्यावरील निदान व उपचार यासंदर्भात मिळालेल्या माहितीचा गावागावात प्रचार आणि प्रसार करावा असे आवाहन केले. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. महाराष्ट्र व कर्नाटक येथील रुग्णांना त्या त्या राज्याच्या उपलब्ध असलेल्या आरोग्य योजनेविषयी माहिती घ्यावी. मात्र आर्थिक परिस्थितीकडे पाहून डोळ्यांच्या उपचारासाठी अजिबात उशीर करु नये. लवकर निदानामुळे आपण अंधत्वाचा धोका टाळू शकतो. आणि उत्तम आयुष्य जगू शकतो.
डॉ.कौस्तुभ पाटील म्हणाले, काचबिंदू कधी होतो हे लवकर आपणांस समजत नाही. तिकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. अन्यथा कायमचे अंधत्व येऊ शकते. नियमित डोळ्यांची तपासणी करावी. ज्येष्ठ नागरिकांना अंधत्व येण्याचे मूळ कारण काचबिंदू असल्याचे सांगितले. डॉ.ऐश्वर्या पांढरेकर यांनी उपचाराची माहिती दिली.
दरम्यान जनजागृती करण्यासाठी पोस्टर प्रदर्शन भरवले होते. त्यातून बरीचशी माहिती सांगण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टर तयार केले होते. त्यातून कुश्मिता मणेर व त्यांचा ग्रुप आणि प्रियांका कोनाडिया व ग्रुप यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आले. सुत्रसंचालन डॉ.अस्मिता मोरे तर आभार डॉ.शलाका क्षीरसागर यांनी मानले.
उपवैद्यकीय अधीक्षक डॉ.शिल्पा गायकवाड, डेप्युटी डीन डॉ.नितीन मुदीराज, डॉ.पंकज पलंगे, डॉ.अजित लिमये यांच्यासह सर्व डॉक्टर, प्राध्यापक तसेच रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.