भारती हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागात महिन्यांत केले "उच्चांकी ६५० उपचार"
सांगली | १९ /१०/२०२२ - (रोहित रोकडे)
भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागात सप्टेंबर महिन्यात ६५० जणांवर उपचार करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी दिली. डीन डॉ.सारा धनवडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजित जोशी हृदयरोग विभागप्रमुख डॉ.अमित जोशी उपस्थित होते.
डॉ.एच.एम.कदम म्हणाले, एकाच छताखाली सर्व उपचार करणाऱ्या भारती हॉस्पिटलमध्ये सर्वांत उच्चांकी ६५० जणांवर हृदयरोग विभागात यशस्वी उपचार करण्यात आले.
एकूण ६५० पैकी २२० जणांवर अँजिओप्लास्टीचे उपचार तसेच इतरांवर स्पेसमेकर, झडपेच्या शस्त्रक्रिया, डिव्हाईस, हृदयाचे छिद्र बंद करणे असे उपचार हृदयरोगतज्ज्ञांनी केले आहेत. २०१३ पासून आजपर्यंत ९ वर्षात सुमारे ३२ हजारांवर अँजिओग्राफी तसेच अँजिओप्लास्टी यशस्वी झाल्या आहेत. दर महिन्याला सरासरी ३५० अँजिओग्राफी व २०० अँजिओप्लास्टी होतात.
डॉ.अमित जोशी म्हणाले, हृदयरोग विभाग सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणारा आहे. पुणे किंवा मुंबईत होणाऱ्या शस्त्रक्रिया आता भारती हॉस्पिटलमध्ये होत आहेत. या व्यतिरिक्त महात्मा फुले जनआरोग्य योजनाही कार्यरत आहे.
यावेळी डॉ.रियाज मुजावर, डॉ.सचिन गावडे, डॉ.योगेश जमगे, डॉ.रोहित श्रीवास्तव, डॉ.राहुल महाडिक यांच्यासह हृदयरोग विभागातील सर्वांचे कौतुक डॉ.एच.एम.कदम यांनी केले. अत्याधुनिक मशिनरीसह भारती हॉस्पिटल २४ तास रुग्णांना सेवा देण्यास सज्ज आहे.