भारती हॉस्पिटलची रुग्णसेवा उत्तम - संभाजी भिडे गुरुजी | उपचारानंतर सादर केले कृतज्ञतापत्र
सांगली | ८ /७ /२०२२
रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा याचा अनुभव आणि प्रचिती देणारे रुग्णालय आज सांगलीत भारती रुग्णालय स्वरूपात कार्यरत असल्याचे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले.
एप्रिल महिन्यात सायकलवरून पडल्याने भिडे गुरुजी येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या डाव्या खुब्याच्या हाडाला फ्रॅक्चर होते. त्यांच्यावर अस्थिरोग विभागप्रमुख डॉ.श्रीकांत देशपांडे, डॉ.सुजय महाडिक यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. पुढील उपचार करून ८५ वर्षीय गुरुजींना पुर्वपदावर आणले. यामुळे त्यांनी भारती रुग्णालयाविषयी कृतज्ञतापूर्वक एक आभारपत्र भारती विद्यापीठ विभागीय मानद संचालक डॉ.एच.एम.कदम यांना सादर केले.
स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या कृतज्ञतापूर्वक पत्रात भिडे गुरुजी म्हणतात,आपण सर्वच डॉक्टर्स व सर्व सेवक वर्गांनी अति मनस्वी वृत्त्तीने माझी सेवा केली ते उपकार मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. लहानपणी प्राथमिक शाळेत असताना आई थोर तुझे उपकार ही कविता मला आठवते व मनात येते, ही सर्वजण आईच्या मायेनीच या रुग्णालयात राबत आहेत. त्या २०-२२ दिवसात सगळ्या रुग्णालयांतील व्यवस्थापनात जो मातृस्पर्शाचा सुगंध जाणवला तो अनुभव शब्दात सांगणे अशक्य असल्याचे गुरुजी म्हणाले.
पुढे गुरुजी म्हणतात, भारती रुग्णालयाचा आदर्श सर्वच रुग्णालयांनी घ्यावा. आदर्श सेवकवर्ग, आदर्श उपचारपद्धती, आदर्श आत्मियतेचे वातावरण सर्व रुग्णालयांतील सेवकवर्गांनी अनुसरल्यावर वैद्यकीय क्षेत्राविषयी लोकांच्या मनात आदर उत्पन्न होईल.
काय वानू आता नुपरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे|| अशीच माझी भावना भारती रुग्णालयाविषयी सदैव राहणार आहे असे सांगून येथील डॉक्टर व सेवकवर्गाला उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंग चरणी प्रार्थनाही केली.
यावेळी डीन डॉ.शहाजी देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सारा धनवडे, डॉ.श्रीकांत देशपांडे, डॉ.सुजय महाडिक तसेच शिवप्रतिष्ठानचे शहरप्रमुख अविनाशबापू सावंत, राजाभाऊ पुजारी, सूरज कोळी, डॉ. आशुतोष बापट, मंगेश मस्कर आदी उपस्थित होते.
मायेची सावली देणारा कल्पवृक्ष स्व. डॉ.पतंगराव कदम यांनी हे रुग्णालय उभे करून सर्वांसाठी सदैव मायेची सावली देणारा अक्षय कल्पवृक्ष उभा केला आहे. त्यांचे सुपुत्र आमदार डॉ.विश्वजित कदम ही वाट निश्चितपणे चालून शतपटीने मोठी करतील असा विश्वासही या पत्रातून भिडे गुरुजींनी व्यक्त केला.